किडझी शाळेत जागतिक टपाल दिन साजरा; पोस्टमन दादांची भेट अन् आई-बाबांसाठी शुभेच्छापत्रे
| अलिबाग | प्रतिनिधी |
मोबाईलच्या एका क्लिकवर संदेश पोहोचण्याच्या आजच्या डिजिटल युगात पत्रांचा गोडवा, टपाल सेवेचे महत्त्व आणि पोस्टमन दादांच्या कामाची ओळख चिमुकल्यांना व्हावी, या सुंदर संकल्पनेतून किडझी शाळेत जागतिक टपाल दिन अनोख्या, आगळ्यावेगळ्या आणि भावस्पर्शी पद्धतीने साजरा करण्यात आला.
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून टपाल विभागाचे मुख्य जिल्हा अधीक्षक राजेश रनाळकर यांच्या संकल्पनेतून आणि किडझी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. लहान वयातच मुलांना टपाल सेवेची ओळख व्हावी, त्यांना पत्रलेखनाची गोडी लागावी आणि आई-वडिलांप्रती प्रेम, आदर व आपुलकी व्यक्त करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आई-बाबांसाठी सुंदर शुभेच्छापत्रे तयार केली. आपल्या लाडक्या आई-बाबांना प्रेमाचे संदेश लिहिताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील उत्सुकता पाहण्यासारखी होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टपाल पेटीच्या प्रतिकृतीत ही पत्रे टाकून प्रत्यक्ष टपाल पाठविण्याचा अनुभव घेतला. पत्र लिहिण्यापासून ते टपाल पेटीत टाकण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली.
टपालविश्वाची अनोखी खिडकी!
पोस्ट ऑफिसमध्ये नेमके काय काम चालते? पत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी पोहोचतात? पोस्टमन दादा आपल्यापर्यंत पत्रे कशी आणतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आली. पुस्तकातील माहितीपुरते मर्यादित न राहता, कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने चिमुकल्यांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सोमनाथ आकरीक आणि वरिष्ठ सहाय्यक समीर म्हात्रे यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले, तर वरिष्ठ पोस्टमन मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना टपाल प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवून टपाल सेवेची माहिती सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली.
अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक
लहान मुलांना खेळातून, कृतीतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला. किडझी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदाचे समीर म्हात्रे यांनी आभार मानले तेर किडझी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदाने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल रायगड डाक अधीक्षक राजेश रनाळकर यांचे विशेष कौतुक केले.






