खडी मशीनवरील अवजड वाहतूक अडवली
| खोपोली | वार्ताहर |
माणकिवली येथील अवजड वाहतुकीवरुन ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गुरुवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खडी मशिनवरील अवजड वाहनांची वाहतूक रोखून आपला संताप व्यक्त केला. माणकिवली- शेणगाव रस्ता हा गेल्या काही वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार करण्यात आला आहे. मात्र याच रस्त्यालगत चार – पाच खडी मिशन असल्याने या खडी मशिनवरुन माल वाहतूक करण्यासाठी येत असलेले मोठमोठी वाहने ही आपल्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त वाहतूक करीत आहेत. याचा फटका रस्त्याला कामाला बसत असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रशासनाने या अवजड वाहतूक करणार्या वाहनांवर दंडात्मक करावी तसेच खडी मशीन मालकांनाही कडक नियम लावावेत अशी मागणी सध्या जोर धरत असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याने शेवटी माणकीवली ग्रामस्थांनी 25 मे रोजी आक्रमक पवित्रा घेत ही ओव्हरलोड वाहतूक अडवली. त्यामुळे याठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
वाहनांविरोधात अनेक महिन्यापासून नाराजीचा सूर उमटत आहेत. या अवजड वाहतूक करणार्यावर प्रशासनाने कडक नियम लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली, परंतु संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस पाऊले न उचलल्याने अवजड वाहतूक अडवली असून पुढील काळात प्रशासनाने यावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडून उपोषण केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.