तर संतोष कांबळी उपसभापती
। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे मनोज भगत तर उपसभापतीपदी संतोष कांबळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकतर्फी विजय मिळविला आहे. यामध्ये शेकापचे 12, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2, ठाकरे गट 1 सदस्य निवडून आलेला आहे. गुरुवारी मुरुड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ए.आर. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. सभापतीसाठी मनोज भगत व उपसभापतीपदी संतोष कांबळी असे दोनच अर्ज प्राप्त झाल्याने श्रीकांत पाटील यांनी या दोघांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यावेळी या दोघांची निवड जाहीर होताच सर्व मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या निवडीनंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना शेकाप तालुका चिटणीस अजित कासार यांनी या पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक महाविकास आघाडी सोबत घेऊन लढणार आहोत. सुपारी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीस मोठे यश प्राप्त झाले आहे.त्यामुळे सर्व निवडणूक सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक, राष्ट्रवादीचे मंगेश दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभापती मनोज भगत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करणे व नवीन कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील चार ठिकाणी आठवडा बाजार भरवल्यामुळे लोकांना माफक दारात वस्तू मिळत आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिके घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सभापती उपसभापती निवड कार्यक्रमासाठी ॲड. इस्माईल घोले, माजी सभापती स्मिता खेडेकर, माजी सरपंच प्रशांत मिसाळ,माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, विजय गीदि, संतोष पाटील, माजी सभापती चंद्रकांत कमाने, मोअज्जम हसवारे, दर्शन काळबेरे, विकास दिवेकर, सचिव दत्ताराम शेडगे, रमेश दिवेकर आदी सह असंख्य कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.