| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. परंतु हा औद्योगिक विकास होत असताना शहराचा व गावाचे गावपण हरवत चालले असल्याचे दिसत आहे. सर्वत्र मातीचा भराव करून वसाहती उभ्या रहात आहेत. तसेच प्रकल्पही समुद्रात मातीचा भराव करून उभे रहात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची बिकट समस्या उभी रहाणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांतील घरांना पाणी घुसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा निचरा न झाल्याने अनेक गावात पूराचे पाणी शिरण्याचा धोका निमार्ण झाला आहे.
मुसळधार पावसाचा निचरा होणारी नैसर्गिक नाले हे उध्वस्त करण्यात आले आहे. तसेच शहरात व तालुक्यात मोकळी जागाच उरली नसल्याने पावसाचे पाणी जाणार कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात गावाभोवती झालेला भराव उंच झाला आहे, तर गावांतील घरे खाली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी हे शहरातील व तालुक्यातील अनेक गावांतील घरांना घुसून उरण बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अनुभव तालुक्यातील काही गावांना येत आहे. यावर्षी यात वाढ होण्याची शक्यता असल्याने जनतेने व प्रशासनाने सतर्क रहाणे आवश्यक आहे.