हॉटेल्स, कॉटेज, घरगुती खोल्या हाऊसफूल
| माथेरान | वार्ताहर |
सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असून अधिकाधिक पर्यटकांची पाऊले माथेरान या पर्यटनस्थळाकडे वळली आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे पर्यटकांनी गजबजले आहे. मुंबई पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे येथे पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. येथील हॉटेल्स, कॉटेज, घरगुती खोल्या पूर्ण क्षमतेने भरल्या होत्या. येथील लाल मातीच्या रस्त्यावरून, प्रदूषण मुक्त वातावरणातुन व इथल्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. यामुळे सलग सुट्ट्या येताच पर्यटकांची पाऊले माथेरानच्या दिशेने निघतात.
आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे येथील पॉईंट, बाजारपेठ गजबजलेली दिसत होती. हॉटेल्स आणि कॉटेज यांचे दर आवाक्यात असल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर माथेरान पर्यटन स्थळी हजेरी लावली होती. काहींनी तर खोल्यांचे आगाऊ आरक्षण केले होते. मे महिन्यात माथेरानमधील पर्यटक संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. येथील वाढत्या पर्यटनामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माथेरानच्या वाढत असलेल्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकाला योग्य सेवा सुविधा पुरविल्या जात आहेत.
आम्ही दरवर्षी माथेरान पर्यटनस्थळी येतो.सध्या सर्वत्र उष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने चार दिवस माथेरानच्या थंड वातावरणात राहण्याचा आनंद घेत आहोत.सकाळी आणि संध्याकाळी पॉईंट परिसरात भटकंती करताना येथे कानावर येणारा वेगवेगळ्या पक्षांचा आवाज येथील सर्व भागात असणाऱ्या माकडांची मर्कटलीला तर कानावर पडणारा घोड्यांच्या टापांचा आवाज यासर्व गोष्टी येथेच माथेरान मध्येच अनुभवण्यासाठी मिळतात.इथला निसर्ग खूपच सुंदर आणि मनमोहक आहे.
जगदीश बागुल, पर्यटक,बदलापूर
मे महिन्यात माथेरान पर्यटक हंगाम तेजीत असतो. मागील तीन दिवस सलग सुट्टी आल्यामुळे पर्यटक येथे भरपूर प्रमाणात दाखल झाले होते. त्यामुळे इथले सगळे व्यावसाय तेजीत असून व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत.
अनिकेत मोरे, व्यावसायिक