गुणवंतांच्या यशाला नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची कौतुकाची थाप
| अलिबाग | प्रतिनिधी |
शहराचा विकास केवळ रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांपुरता मर्यादित नसून शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी आणि त्याच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे, हाही विकासाचा महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी केले. समावेशक शिक्षणाचा संदेश अलिबाग नगर परिषद उर्दू हायस्कूलमध्ये गुरुवारी (दि. 8) पार पडलेल्या एसएससी 2025-26 गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभातून देण्यात आला.
अलिबाग नगर परिषद उर्दू हायस्कूल आणि इकरा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित या सत्कार समारंभात नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांची शाळा किंवा शिक्षणाचे माध्यम वेगळे असले तरी त्यांच्या स्वप्नांना आणि गुणवत्तेला कोणतीही सीमा नसते. प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्याची समान संधी मिळणे आवश्यक आहे,” नाईक म्हणाल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या निकालाचा गौरव नसून त्यांच्या मेहनतीला समाजाकडून मिळालेली दाद आहे. अशा कौतुकामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात अधिक मोठे यश संपादन करण्याची प्रेरणा मिळते. आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्व तयार होणार आहेत, असे उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले.
अलिबाग शहरातील विविध समाजघटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कर्तृत्वाची समाजासमोर दखल घेतली जावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. “प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे यश हे अलिबागचे यश आहे,” या भावनेतून कार्यक्रमाकडे पाहिले गेले. एसएससी 2025-26मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरण्यासोबतच अलिबागच्या शैक्षणिक वाटचालीत समावेशकतेचा नवा संदेश देणारी ठरली.
कार्यक्रमाला अलिबाग नगरपरिषदेचे वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, तसेच प्रमुख पाहुणे इक्बाल हसन बुरान (निवृत्त अधीक्षक), नगरसेवक जमाल सय्यद, अश्विनी ठोसर, कैसर दणदणे, प्रा. साजिद शेख, सिकंदर शेरखान, अस्मा अल्वी, शहनवाज शेरखान यांच्यासह मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शहाबुद्दीन धणसे आणि सचिव रमजान सय्यद यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्राचार्या फरहीन ढोकले आणि शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
