सात महत्त्वाची पदे रिक्त, रुग्णांचे हाल
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईमुळे रुग्णालयच ‘आजारी’ पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा ग्रामीण रुग्णालयात एकूण 25 पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी वर्ग-1 आणि वर्ग-2 अधिकाऱ्यांसह एकूण सात महत्त्वाची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, आवश्यक मनुष्यबळाविना रुग्णालयाचा कारभार चालविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
विशेष म्हणजे, दंतशल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजिशियन आणि अस्थिरोग तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक) यांसारखी अत्यंत महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा मिळत नाही. गंभीर रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागत असून, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचीदेखील प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. एक्स-रे मशीन असले तरी त्याद्वारे केवळ छातीचा एक्स-रे काढला जात असल्याची माहिती आहे. तसेच रक्त तपासणीसाठी आवश्यक असलेली सीबीसी मशीन उपलब्ध असूनही तिचा वापर होत नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अनेक तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, आपत्कालीन सेवेसाठी असलेली 108 रुग्णवाहिका महिन्यातील बहुतांश दिवस बंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील अपघातग्रस्त किंवा गंभीर रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असताना तिचा नियमित लाभ नागरिकांना मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रसूतीनंतर महिलांसाठी आवश्यक असलेला स्वतंत्र कक्ष नसल्याने मातांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, 30 बेड क्षमतेची सुसज्ज इमारत असलेल्या या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी शासनाने 70 लाख 32 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, इमारतीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा त्या इमारतीत सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी मिळतो, पण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारी कुठे आहेत?” असा संतप्त सवाल आता तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. आरोग्य व्यवस्थेतील या गंभीर त्रुटींकडे शासन आणि आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, केवळ इमारती नव्हे तर आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.





