| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर चालक, मालकांच्या प्रलंबित मागण्या दूर करण्यात सरकारला अपयश आले आहे. मिनीडोअर चालकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या आ.महेंद्र दळवींकडून संघटनेचाही अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले आहे.
मिनीडोअर चालकांसाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्यात आली. त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सुचनादेखील करण्यात आल्या. मात्र प्रशासनाकडून अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात नाही. त्याचा फटका जिल्ह्यातील मिनीडोअर चालक मालकांना बसू लागला आहे. सरकारने दिलेल्या सुचनांची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघाकडून करण्यात येत आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना संघटनेच्यावतीने गुरुवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा विक्रम, मिनीडोअर चालक मालक संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष दिपक म्हात्रे, सदस्य आदेश मोरे, प्रभाकर कासकर, मधुकर ठाकूर, निलेश म्हात्रे, सतीश थळे, संदेश गावंड आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर चालकांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. या प्रशासनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिनीडोअर चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, 17 मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत मिनीडोअर विक्रम, मॅजिक चालक मालक यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आदेश देण्यात आले होते. महिनाभरात प्रश्न सोडविण्याच्या सुचना संबंधित विभागाला बैठकीच्या माध्यमातून देण्यात आल्या. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनेक वाहनांची पासिंग रखडल्याने गाड्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
अनेक परमिट बाद होत आहेत. सीएनजी ऐवजी पेट्रोलवर वाहने चालवावी लागत आहेत. त्याचा आर्थिक फटका चालक, मालकांना प्रचंड बसू लागला आहे.पासिंगसाठी शंभर कि.मीपेक्षा जास्त अंतर दुर यावे लागत आहे. हायड्रो टेस्टींगसाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा भुर्दंड भोगावा लागत आहे. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा नाहक त्रास चालक व मालकांना होत आहे. प्रशासनाने कार्यवाही तात्काळ करावी यासाठी रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.