तिसर्‍या लाटेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

। मुंबई । वृत्तसस्था ।
कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. यामध्ये मालाड येथे 2170 बेडचे भव्य जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये 1550 ऑक्सिजन बेड, 190 आयसीयू आणि पीडिऑट्रिक वॉर्डमध्ये 250 बेड उपलब्ध राहणार आहेत. या जम्बो कोविड सेंटरचे उद्या लोकार्पण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच झपाटयाने रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांत सुरू केलेल्या विशेष कोव्हिड सेंटरमधील बेड अपुरे पडू लागल्याने आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असणारे सहा जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने आढळणाऱया रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध झाली. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेल्या दहिसर, बीकेसी आणि मुलुंड कोविड सेंटरचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गरज लागली तर ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सद्यस्थितीत सहापैकी वरळी एनएससीआय डोम आणि गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण असून दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत, तर भायखळ्याच्या रिचर्डसन क्रुडास सेंटरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. फक्त अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 50 टक्के कोरोना रुग्ण आहेत.मालाडसह रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा या ठिकाणी आणखी तीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकूण 5500 बेड उपलब्ध होणार आहेत.

Exit mobile version