गोवा येथे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून देशाचे आणि मुरुड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणारे कराटेपटू प्रसाद प्रकाश चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दिनांक २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान गोवा येथे होणाऱ्या ”वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप” स्पर्धेत देशभरातून निवडक खेळाडू सहभागी होणार आहेत. कराटे खेळामध्ये विविध राष्ट्रीय तसेच आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर प्रसाद चौलकर यांनी स्वतः स्पर्धेत सहभागी होणे थांबवले होते. आपलं या खेळातील प्राविण्य इतरांना शिकवून पूर्ण वेळ उत्तमोत्तम खेळाडू घडवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मधल्या काळात किकबॉक्सिंग या खेळात देखील नैपुण्य मिळवण्याची इच्छा झाली आणि प्रसाद यांनी या खेळाचा सराव करण्यास सुरुवात केली. येणाऱ्या काळात या किकबॉक्सिंग खेळात देखील स्वतःची छाप उमटवणार असल्याचा विश्वास चौलकर यांना आहे.
आपण सगळे आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो, मलाही विद्यार्थी म्हणून जगायला आवडतं असे चौलकर सांगतात. नेहमी शिकत राहणे, काहीतरी चांगलं आणि नाविन्यपूर्ण करणे जेणेकरून स्वतःसोबत आपल्या कुटुंबियांचे, आपल्या गावाचे आणि देशाचे नाव मोठे होईल यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे देखील चौलकर यांनी सांगितले.
प्रसाद चौलकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून वाको इंडिया कीकबॉक्सिंगचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री निलेश शेलार तसेच नवी मुंबईचे पदाधिकारी श्री आशिष राणे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसाद चौलकर यांचा एकूण प्रवास इतर युवकांना प्रेरणादायी असून पुढील वाटचालीत मोठे यश संपादन करतील असा विश्वास प्रसाद यांचे कराटे प्रशिक्षक सेन्सेई अरुण बोडके यांनी व्यक्त केला.