| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल बाजार समितीच्या सभापती आणि उपासभापतीपदा करता बुधवारी ( ता.24) पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदावर नारायण घरत तर उपसभापती पदावर सुनील सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी भारती काटुळे यांनी काम पाहिले.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 17 जागांवर बिनविरोध विजय मिळवला असल्याने सभापती आणि उपासभापती पदावर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होणार हे जवळपास निश्चित असल्याने बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयाची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयी मिरवणूकीने आपला आनंद व्यक्त केला या प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना ( उद्धव ठाकरे ) जिल्हा सल्लागार बबन पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, सुदाम पाटील,काशिनाथ पाटील,काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, शेकापचे जिल्हा चिटणीस गणेश कडू, देवा पाटील, पुरुषोत्तम भोईर, संजय भंडारी आदींसह शेकडोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले पनवेल आणि उरण विधानसभा तसेच पनवेल महानगरपालिका आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत एकत्र लढवून या दोन्ही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निश्चितच विजय खेचून आणेल असा विश्वास बोलून दाखवला . त्याची सुरुवात आपण पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीतला विजय, आणि आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्ष्मीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले 17 सदस्य आहेत,असे ते म्हणाले, यावेळी बोलताना शिवसेना ( ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले की, पनवेल अर्बन बँकेनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. अशाचप्रकारे आपण एकत्रितपणे पुढील सर्व निवडणूका लढल्यास रायगड जिल्हात दोन खासदार व सात आमदार हे महाविकास आघाडीचेच असतील यात तिळमात्र शंका नाही असेही त्यांनी सांगितले तर मा आ बाळाराम पाटील यांनी सुद्धा सर्व विजयी संचालकमंडळाचे अभिनंदन करीत आगामी काळात सुद्धा विरोधकांना डोक वर काढून द्यायची नाही असे कामकाज करा असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले, जर आमच्या काँग्रेस पक्षातील कोणी प्रसारमाध्यमांना काही माहिती सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत असून त्याचा या महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आमचे वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोमाने काम करू असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्या हस्त सभापती नारायण शेठ घरत उपसभापती सुनील सोनावळे, सदस्य देवेंद्र गंगाराम मढवी, अशोक गणू गायकर, मच्छिंद्रनाथ गणा पाटील, बाळकृष्ण नारायण पाटील, महादू गोपाळ पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर,ललिता गोपीनाथ फडके, सखाराम गंगाराम पाटील, देवेंद्र अनंत पाटील, सोमनाथ जनार्दन म्हात्रे, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक, आतिश दत्ता पाटील, काँग्रेसचे रामचंद्र आत्माराम पाटील, आणि शिवसेनेचे प्रताप चंद्रकांत हातमोडे यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कामगार पक्ष हा कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज झालेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची निवड करण्यात आली.
शेकापची शिकवण
पनवेल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. नारायणशेठ घरत यांच्या सभापती आणि सुनील सोनावळे यांच्या उप सभापती निवडीवर कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला होता. यावेळी काही पदाधिकाऱ्यांजवळ याबाबत चर्चा केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष म्हणजे नेमकं काय आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, आज सभापती निवड आणि उपसभापती निवड करताना कोणतेही आरक्षण नव्हते, मात्र शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच साऱ्यांचा विचार केला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे आणि एकसंघ कसे राहावे ही शिकवण देणारी संघटना म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आहे, हे आजच्या निवडीवरून समोर येतं.