| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मोदी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद साजरा करण्याऐवजी 2024 ची तयारी सुरू केली आहे. 30 मे ते 30 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यक्रमांमध्ये 2024 च्या तयारीचा समावेश आहे.
नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यांमध्ये आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी आता पूर्व उत्तर प्रदेशपासून सुरुवात करून दर महिन्याला एक किंवा दोन दिवस उत्तर प्रदेशात जातील. लोकसभेच्या जागांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील 48 जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी पुढील महिन्यापासून प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करून तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. जे. पी. नड्डा यांनी नुकताच दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला. बिहारमधील लोकसभेच्या 40 जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी केंद्रीय योजनांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाण्यास सुरुवात करणार आहेत.
मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी राजस्थान आणि मध्य प्रदेशचा दौरा सुरू केला आहे. पंतप्रधान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानला जाऊन आले होते. जून सुरु होताच ते मध्य प्रदेशात जातील. तिथे ते पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करतील. या राज्यांमध्ये जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्रालयांकडून या राज्यांशी संबंधित योजनांचा तपशीलही मागवला आहे.