राष्ट्रवादीची हक्काची जागा निसटली

सामुहिक अपयश असल्याची सुनील तटकरे यांची कबुली

| मुंबई | प्रतिनिधी |

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची होती. मात्र, ही जागा पक्षाला मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच कमी पडलो असून, हे आमचे सामूहिक अपयश मानले पाहिजे, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली. दरम्यान, महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जावी, यासाठी चर्चा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख नऊ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अद्याप चर्चेची संधी आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढविली गेली पाहिजे. ही आपली भूमिका असून पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर गरज पडल्यास मुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेतृत्वाचीही भेट घेऊ, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची वाटाघाटीची क्षमता कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असेही तटकरे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा पक्षाचा आग्रह सुरुवातीपासून होता. पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघातून अरुण लाड हे निवडून आले होते. नंतरच्या राजकीय घडामोडी वेगळ्या असल्या तरी त्यावेळी झालेले मतदान हे पक्षाच्या चिन्हावर झाले होते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी आमची ठाम भूमिका होती, असे तटकरे यांनी सांगितले. महायुतीतील विधानपरिषदेच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्तरावर झाल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version