| अलिबाग | प्रमोद जाधव |
उन्हाळी सुट्टी पडल्याने प्रवासीदेखील रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. शनिवार व रविवारी तर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येणारे व परतीच्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका कायमच बसत आहे. पोयनाड, वडखळ, पेण, तिनविरा मार्गावर सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांसह पर्यटक त्रस्त होत आहे. वाहतूक कोंडीचा हा फेरा संपणार कधी, असा सवाल विचार जात आहे.
दर आठवड्याला शनिवार व रविवार सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येत आहे. त्यात उन्हाळी वातावरणापासून सुटका घेण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला अधिक पसंती दर्शविली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील समुद्रकिनारे शनिवार व रविवारी पर्यटकांनी फुलत आहे. काही पर्यटक शुक्रवारी रात्री येतात. तर, काही पर्यटक शनिवारी सकाळी दाखल होतात. शनिवार व रविवारी पर्यटक जिल्ह्यात वाढत असल्याने रस्त्यांवर वाहनांची वर्दळदेखील प्रचंड वाढली आहे. परिणामी, अनेक वेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांसह पर्यटकांना निश्चित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही.
पर्यटकांसह प्रवाशांना वाहतूक कोंडाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचारी कंबर कसत आहेत. रात्रीचा दिवस करून उन्हातान्हात उभे राहून वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तरीदेखील वाहतूक कोंडाचा फेरा सोडविण्यास वाहतूक पोलीस उदासीन असल्याचे प्रवाशांसह पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. नाक्यावर नेमलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या जागी दोनच कर्मचारी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात. तर काही कर्मचारी आरामात एका दुकानांमध्ये खुर्ची मांडून बसलेले असल्याच्या तक्रारी आहेत. फक्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भरोवश्यावर वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा भार पडत आहे. अलिबाग-पेण मार्गावरील गोंधळपाडा, चेंढरे बायपास, तिनविरा, पोयनाड, वडखळ या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अनेक वेळा तासन्तास रस्त्यावर वाहने उभी राहात आहे. दोन तासात पनवेलला पोहोचणाऱ्या वाहनांना तीन तास लागत आहे. त्याचा परिणाम अलिबाग-पनवेल मार्गावरील प्रवाशांना दर शनिवार व रविवारी भोगावा लागत आहे. वाहतूक कोंडीचा हा फेरा संपत नसल्याने प्रवासी व पर्यटकांमध्येदेखील नाराजीचे सूर उमटत आहेत.
तिनविरा बनतोय अपघात ठिकाण
अलिबाग-पेण मार्गावरील तिनविरा येथील वळणावर वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांकडून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील आठव्यापासून आतापर्यंत या तिनविरा परिसरात तीन अपघात झाले आहे. तिनविराजवळ येथील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरा, पिवळा पट्टा नाही. ते पट्टे नसल्याने काही वाहने भरधाव वेगात जात आहेत. त्यामुळे या गतिरोधकावर अपघात होण्याच्या घटना घडत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
बेशिस्त वाहन चालक कारणीभूत
वाहनांचे चालकांच्या बेशिस्तपणचा फटकाही प्रवाशांसह पर्यटकांना बसत आहे. निश्चित स्थळी लवकर पोहचण्याच्या नादात काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत बेफीकरपणे वाहन चालवितात. काही जण चुकीच्या मार्गाने वाहन चालवतात, तर काही जण रस्त्यावरच वाहने उभी करुन ठेवतात.त्यांचा बेशिस्तपणा वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होत आहेत. वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ज्यादा वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यावर तैनात केले जात आहेत. मात्र, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ज्याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणची कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो.
सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड