| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाड शहरातील पूरस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा तातडीने उपसा करण्याची आवश्यकता आजमितीस दूर्लक्षित करण्यात आली आहे. दुसरीकडे महाडच्या पूरस्थितीवर गाळउपसा करण्याचा जोर मात्र कायम असल्याचे दिसून येत असल्याने पुराच्या पाणीप्रश्नावर वाळूरूपी गाळाचा अनाकलनीय संबंध अर्थपूर्ण वाटत असल्याचीच चर्चा दोन्ही तालुक्यात सर्वत्र होत आहे.
पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले असे आहे. गेल्या वर्षी झालेल्या 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठयापैकी 22 मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद 25946 घनमीटर पाणीसाठयाचा विसर्ग झाला.
महाड शहर व परिसरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीमध्ये रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा पाणीसाठा पूर्णत: रिकामा असल्यास अतिवृष्टीकाळामध्ये बॅकवॉटरची धोक्याची पातळी भरून ओव्हरफ्लो होऊन महाडच्या दिशेने वाहणाऱ्या नदीपात्राचा प्रवाह कमी असेल, असे मत प्रस्तुत प्रतिनिधीने विविध बैठकांवेळी व्यक्त केले होते. याअनुषंगाने मे 2022 पासून बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास सुरूवात होऊन संपूर्ण बॅकवॉटरचा जलाशय रिकामा करण्यास सुरूवात झाली होती. मात्र, यंदा बॅकवॉटरचा साठा पुर्णपणे तुडूंब भरलेला असून महाड येथील सावित्री नदीपात्रातील वाळुरूपी गाळ उपसा जसा वेगाने होत आहे. त्या तुलनेमध्ये रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा विसर्ग करण्याकडे सपशेल दूर्लक्ष झाले आहे. परिणामी, भर उन्हाळयामध्ये रानबाजिरेपासून पोलादपूर व त्यापुढील गावांमध्ये सावित्री नदीचे पात्र सर्वत्र कोरडे पडले असून नदीलगतच्या कुटूंबियांना कपडे धुणे भांडी घासण्यासारख्या कामांसाठीदेखील पुरेसे पाणी नदीपात्रामध्ये शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या नदीपात्रामध्ये काही ठिकाणी वाळूरूपी गाळउपसा मोठया प्रमाणात सुरू असल्याने या कामात रानबाजिरे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास अडथळा होण्याची शक्यता असल्याने यंदा जाणीवपूर्वक रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास विलंब केला जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.