नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर फेऱ्या वाढविल्या
| नेरळ | प्रतिनिधी |
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी सध्या उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या मिनीट्रेनचे आकर्षण आहे. हे लक्षात घेत मध्य रेल्वेकडून सोमवारपासून नेरळ येथून एक आणि माथेरान येथून अशी नवीन गाडी सुरू झाली.
दरम्यान, या मार्गावर मिनी ट्रेन सुरु व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि विवेक चौधरी यांनी पत्र देऊन मागणी केली होती.माथेरान पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मिनीट्रेनमध्ये वाढ करण्याची मागणी करणारे माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि विवेक चौधरी यांच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांना दि. 19 मार्च 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते. मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि अमन लॉज शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये तसेच प्रवासी डब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी निवेदन दिले होते. माथेरानचा पर्यटन हंगामास सुरुवात होणार असून, पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत असते.
पर्यटकाला मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा, अशी इच्छा असते. बऱ्याच पर्यटकांना प्रवासी डब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता शटल सेवा ही आठ डब्यांची करण्यात यावी, पर्यटन हंगाम लक्षात घेऊन माथेरान अमन लॉज ही शटल सेवा शनिवार-रविवारप्रमाणे सोमवार ते शुक्रवार या दिवशीदेखील शटल सेवेच्या कमीत कमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा चालविल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली. वाहनतळ आणि दस्तूरी नाका येथे मिनी ट्रेन वेळापत्रकाचे इंडिकेटर लावण्यात येणार आहेत.