खोपोलीत नवजात बाळाचा मृत्यू

| खोपोली | प्रतिनिधी |

लग्नानंतर तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात चिमुकलीचे आगमन झाले आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, हा आनंद अवघ्या नऊ दिवसांतच दुःखात बदलला. खोपोलीतील सुमित्रा राज रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत संताप व्यक्त केला. उपचारांबाबत नातेवाईकांनी आक्रमकपणे जाब विचारल्यानंतर परिस्थिती पाहता रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिस्ता मुस्तफा जळगावकर यांना लग्नानंतर सात वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली होती. 29 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी त्यांना सुमित्रा राज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर बाळाचा जन्म झाला. जन्मानंतर बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नवव्या दिवशी बाळाला तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी बाळाला कावीळ झाल्याचे सांगून औषध देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच बाळाच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बाळाचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. बाळाच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच त्याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

Exit mobile version