माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेवर आक्षेप

सर्वसमावेशक संघटना स्थापन करण्याची मागणी

| कोर्लई | प्रतिनिधी |

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुरुड येथील जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस. ए. हायस्कूलमध्ये नुकतीच स्थापन करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी संघटनेला माजी विद्यार्थ्यांनीच तीव्र विरोध दर्शविला आहे. सध्याची संघटना रद्द करून सर्व माजी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन नव्याने अधिकृत, सर्वसमावेशक व प्रतिनिधिक माजी विद्यार्थी संघटना स्थापन करावी, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शंभर वर्षांहून अधिक गौरवशाली परंपरा लाभलेल्या सर एस. ए. हायस्कूलने हजारो विद्यार्थी घडविले असून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी या संस्थेचे ऋणी आहेत. मात्र, 31 जुलै 2026 रोजी स्थापन करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी संघटनेची प्रक्रिया अत्यंत मर्यादित माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आदी पदांची निवड सर्व माजी विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता करण्यात आल्याने अनेकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या मते, संघटना ही सर्वांची असल्याने तिची स्थापना पारदर्शक, लोकशाही पद्धतीने आणि सर्वसमावेशक स्वरूपात होणे आवश्यक आहे. प्रत्येक उत्तीर्ण बॅचमधून किमान दोन पुरुष व दोन महिला प्रतिनिधींचा समावेश करून व्यापक संघटना उभारावी. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत सर्वसाधारण सभा घेऊन संघटनेची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यापासून संघटना उभारणीपर्यंत आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारीही माजी विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे. सध्याच्या संघटनेचा फेरविचार करून सर्वांना सहभागी करून नव्याने अधिकृत माजी विद्यार्थी संघटना स्थापन करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, श्रीमती जोशी, प्रमोद भायदे, उदय दांडेकर, पांडुरंग आरेकर, आदेश दांडेकर, कुणाल सतविडकर, अरविंद गायकर, अशिलकुमार ठाकूर, उमेश भोईर, अभिजित सुभेदार, सागर चौलकर, युवराज भगत, माने, गणेश मसाळ, प्रतीक उमरोटकर, महेश मानकर, ललित जैन, जागन पुलेकर, विशाल कोलवणकर, सुशील ठाकूर, निलेश पुलेकर, नरेंद्र माने आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version