। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) विकासाच्या प्रवासात शनिवारी (दि.1) आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. विमानतळावर पहिल्या मालवाहू (कार्गो) विमानाचे यशस्वी लँडिंग होत अधिकृत कार्गो सेवेला प्रारंभ झाला. या कामगिरीमुळे नवी मुंबई विमानतळाने देशाच्या हवाई मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
इंडिगो एअरलाइन्सचे IndiGo CarGo (Airbus A321-211(P2F)) हे मालवाहू विमान बंगळुरू येथून उड्डाण करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या दाखल झाले. या यशस्वी लँडिंगनंतर इंडिगो ही नवी मुंबई विमानतळावर कार्गो ऑपरेशन्स सुरू करणारी पहिली एअरलाइन ठरली आहे.
सुमारे 18 वर्षे जुने असलेले VT-IKX (फ्लाइट 6E9031) हे विमान धावपट्टीवर उतरल्यावर कार्गो टर्मिनलकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर हेच विमान नवी मुंबईहून संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहकडे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा सुरू झाल्याने महाराष्ट्रासह देशातील उद्योग, निर्यातदार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. जलद आणि कार्यक्षम हवाई मालवाहतुकीमुळे व्यापाराला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील औद्योगिक पट्टा, जेएनपीए बंदर, तळोजा, पनवेल, उरण आणि रायगड परिसरातील उद्योगांना या कार्गो सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. निर्यात-आयात प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क अधिक मजबूत होईल.
यापूर्वी प्रवासी उड्डाणांच्या यशस्वी चाचण्या आणि नियमित सेवेनंतर आता कार्गो सेवेलाही प्रारंभ झाल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. आगामी काळात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मालवाहू उड्डाणे येथून सुरू होण्याची शक्यता असून, नवी मुंबई विमानतळ भारतातील महत्त्वाचे कार्गो हब म्हणून उदयास येण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.
NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग
