| अलिबाग विशेष प्रतिनिधी |
भरधाव कारचा अपघात होऊन एक तरुण ठार झाल्याची घटना तालुक्यातील कार्लेखिंडीतील मैनुशेठचा वाडा परिसरात घडली.साहस बांधनकर, रा. वरळी कोळीवाडा, मुंबई असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
अलिबाग-पेण मार्गावरुन प्रवास करीत असताना कार्लेखिंड येथे मैनुशेठचा वाडा परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या बाजूला गाडी पलटी झाली. त्यात साहस बांधनकर हा इसम जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. साहस बांधनकर याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, सदर अपघात पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मात्र, अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालयात मृत इसमाला नेण्यात आल्याने पहाटे घडलेल्या अपघाताची नोंद कुठल्याच पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.