| अलिबाग | प्रमोद जाधव |
प्रवाशांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविणारे एसटी महामंडळ मात्र प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेशा साधन सामुग्रीचा अभाव असल्याने एसटीची यंत्रणा तितकीशी सक्षम नाही. त्यामुळेे एसटी बसची अग्नी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
एसटी महामंडळाच्या रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, महाड, श्रीवर्धन असे आठ एसटी बस आगार आहेत. या आगाराच्या अखत्यारित 19 बसस्थानके आहेत. स्थानकांमधून सुमारे 480 एसटी बसेस दररोज धावतात. त्यात शिवशाही, निमआराम, साधी बस, अशा वेगवेगळ्या बसेसचा समावेश आहे. जिल्ह्यातून एसटी दिवसाला एक लाख किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करीत असून, हजारो प्रवासी एसटी बसमधून प्रवास करतात. त्यात अलिबाग-पनवेल, पेण-पनवेल विना थांबा सेवा देण्यावर एसटी महामंडळाने अधिक भर दिला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळ वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. मात्र, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटीच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर येऊ लागला आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. कडक उन्हाचे चटके नकोसे झाले आहेत. कडाक्याच्या उन्हात तापमान वाढत असल्याने इंजिन गरम होण्याच्या घटना घडत आहे. महिन्याभरापूर्वी एका बसने पेट घेतला होता. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुविधा नसल्याने बस आगीत भस्मसात झाली. उन्हामुळे आग लागण्याची भीती अधिक असतानादेखील एसटी महामंडळ रायगड विभाग प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. एसटीमध्ये असलेल्या अग्नी यंत्राची रिफील न करणे, यंत्र कुठेतरी अस्ताव्यस्त पडलेले असणे, खराब झालेल्या यंत्राच्या जागी नवीन यंत्र बसविण्यास दुर्लक्ष करणे, हा प्रकार एसटी महामंडळाकडून वारंवार होत आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह चालक व वाहकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
एसटीची वायफाय सेवा बारगळी
एसटी महामंडळातील गाड्यांमध्ये यंत्र मीडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा सुरू केली होती. रायगड जिल्ह्यातील 500हून अधिक वाहनांमध्ये वायफाय सेवा सुरू ठेवली होती. साध्या, निमआराम एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनधारक प्रवाशाला प्रवास करताना मनोरंजनाचा खजिना मिळत होता. मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून नेटवर्क चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांचा आनंद या वायफायद्वारे मोफत घेता येत होता. मनोरंजनात्मक कार्यक्रम पहायला मिळत असल्याने एसटीतून प्रवास करणारे प्रवासीदेखील वाढू लागले. 2018 पासून सुरू झालेली ही योजना दीड वर्षात बंद पडली. इंटरनेट सुरू केल्यानंतर कनेक्ट न होणे, वेब सर्चिंग न होणे, असा प्रकार घडू लागला. प्रवाशांचा प्रवास रंजक व्हावा यासाठी सुरु केलेली ही सेवा बारगळी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतु, प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एसटी महामंडळ दुर्लक्षितच आहे. काही एसटीमधील अग्नीरोधक यंत्र खराब झालेले आहेत. काही यंत्राचे रिफील केलेले नाही. यंत्र योग्य ठिकाणी न ठेवल्याने अनेक वेळा प्रवाशांना बसमधून चढताना व उतरताना अडथळा ठरत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने अग्नीरोधक यंत्र तातडीने बसवून घ्यावे.
सदानंद सावंत, प्रवासी
प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक बसमध्ये अग्नीरोधक यंत्र बसविले आहेत. ज्यादा यंत्राचा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक आगारातील आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार रिफीलींग करण्यापासून खराब झालेल्या यंत्राची तपासणी केली जात आहे. मात्र, काही बसमध्ये नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ त्या बसमध्ये यंत्र बसविण्यास सांगितले जाईल.
दीपक घोडे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड विभाग