शिलार धरणासाठी 3,672 कोटींचा ऐतिहासिक प्रस्ताव
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पनवेल शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शिलार धरण प्रकल्प उभारण्याच्या दिशेने पनवेल महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 672 कोटी 75 लाख रुपयांचा आर्थिक वाटा उचलण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.22) सकाळी 11 वाजता पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. ही सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाली. महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक बांधिलकींपैकी हा एक प्रस्ताव मानला जात आहे.
पनवेलमध्ये वाढती लोकसंख्या, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक विकास, नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि वेगाने होणारे शहरीकरण यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे 60 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता असून भविष्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार 2036 पर्यंत पनवेलची लोकसंख्या 26 लाखांवर, तर 2056 पर्यंत 39 लाखांहून अधिक होणार आहे. त्यानुसार भविष्यात 579 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असून, शिलार धरणातून दररोज 500 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याने पनवेलच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे.
या प्रकल्पात पनवेल महानगरपालिकेचा आर्थिक वाटा 3,672.75 कोटी रुपये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 734.35 कोटी रुपये आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा 462.62 कोटी रुपये इतका राहणार आहे. यासाठी 2027-28 ते 2031-32 या कालावधीचा पाच वर्षांचा आर्थिक आराखडाही तयार करण्यात आला आहे.
राज्य शासनाने शिलार धरण प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली असून, मुख्य सचिवांच्या बैठकीत प्रकल्पाच्या आर्थिक आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आता बुधवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा होऊन मंजुरी मिळाल्यास पनवेलच्या दीर्घकालीन जलसुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.






