जिल्ह्यात पहिल्यांदा सहा बक्षिसांची खैरात
| महाड | प्रतिनिधी |
विद्युत झोतातील सरपंच चषक ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत परि इलेव्हन संघ विजयी ठरला, तर काळभैरव नडगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट स्पर्धेत सहा नंबरची बक्षिसे देण्यात आली. क्रिकेटप्रेमींनी याचं स्वागतच केलं आहे.
विद्यमान सरपंच सुनील कोपै यांच्या आयोजनातून महाडमधील क्रिकेट पंढरी समजली जाणाऱ्या चांदे क्रीडांगणावर दि. 17 ते 19 मेदरम्यान विद्युत झोतात ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याला क्रिकेटप्रेमींचा जोरदार पाठिंबा लाभला.
या वर्षाच्या क्रिकेट हंगामातील ही शेवटची गाव टू गाव या प्रकार क्रिकेट स्पर्धा होती. एकूण 40 संघांना आयोजक सरपंच सुनिल कोपै यांनी सहभाग दिला. मर्यादित षटकांच्या या स्पर्धेत योगेश पेणकर यांनी आपल्या चौकार-षटकारांच्या सहाय्याने दोन अर्धशतकं झळकावत क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन केलं.
अंतिम सामना परि इलेव्हन विरुद्ध काळभैरव नडगाव यांच्यात सामना रंगला. अखेर परि इलेव्हन संघ अंतिम विजेता ठरला. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक 77 हजार 777 रोख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 44 हजार 444, तर तृतीय क्रमांक चोचिंदे संघ, चतुर्थ वरंध संघ, पाचवा करंजखोल, सहावा क्रमांक टिनू दादा (मॉर्निंग मस्ती) या संघाने पटकाविला.
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज योगेश पेणकर, सर्वोत्कृष्ट गोलदांज करंजखोलचा विशाल कांबळी यास गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे, सुभाष महाडिक, बाळू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस समारंभ जि.प. माजी सदस्य जितू सावंत, सुनिल कोपै, मनोहर रेशीम, हेमंत चांदलेकर, राजू शिंदे, अशोक सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेकरिता समालोचक दिपक मंडलीक यांच्यातर्फे युट्युब द्वारे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. समालोचक म्हणून तीन दिवस मिलिंद शिकै यांनीही काम केलं. पंच म्हणून मुन्ना लाले, बंटी जाधव, अझर मापकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मुन्ना लाले, शेखर कोपै, विजय पवार, आप्पा धुमाळ, सुरेश पवार, सुभाष महाडीक यांनी मेहनत घेतली. स्पर्धेदरम्यान आ. भरत गोगावले व इतर मान्यवरांनी भेट देऊन खेळाडू आणि आयोजकांचं मनोबल वाढविले.