| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूल खुला करण्यात आला आहे. 2003 पासून त्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येत होता. मात्र नवीन पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यावर कोणत्याही प्रकारचे उदघाटन सोहळा न करता पादचार्यांसाठी खुला झाला आहे. दरम्यान, या पादचारी पुलाचा एक भाग फलाट एकच्या बाहेर उतरविण्यात यावा? अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
2003 मध्ये देशाचे रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी नेरळ स्थानकाला भेट दिली असता नेरळ स्थानकात नवीन पादचारी पूल उभारण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाचे बांधकाम सुरु झाले. मात्र त्या पुलाचे बांधकाम अनेक वर्षात पूर्ण झाले नाहीत. शेवटी 2021 मध्ये नेरळ स्थानकाच्या कायापालट करण्याचे सुरु झाल्यानंतर 2022 मध्ये जुन्या पादचारी पुलाचे भाग तोडून तेथे नवीन पादचारी पुलाचे काम सुरु झाले होते.
या नवीन पादचारी पुलाची रुंदी मोठी असून एकावेळी शेकडो प्रवासी त्या पादचारी पुलावरून ये-जा करू शकणार आहेत. तसेच तीन ठिकाणी हा पादचारी पूल उतरत असून त्या पादचारी पुलाच्या पायऱ्या या रंगीबेरंगी रंगांनी रंगविल्या असून त्या पायऱ्या यामुळे आकर्षक बनल्या आहेत.