घनकचरा प्रकल्पावर शेकडो जनावरे मोकाट
जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
। पेण । प्रतिनिधी ।
लम्पी स्कीन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गीय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पेण नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पावर शेकडोंनी जनावर बेवारसपणे वावरत आहेत. आंबेगाव धामणी येथे नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या घनकचरा प्रकल्पावर पुर्ण नियंत्रण हे नगरपालिकेचे असून या घनकचरा प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी सिक्यूरीटी गार्डची देखील नेमणूक केली आहे.सिक्यूरीटी गार्डचा पत्ताच नाही. वेगवेगळया तीन सिफ्टमध्ये सिक्यूरीटी गार्डची नेमणूक केली आहे. यासाठी पेण नगरपालिका लाखो रूपये मोजत आहे. या घनकचरा प्रकल्पावर सिक्यूरीटी गार्ड नाही. स्वामी समर्थ सिक्यूरीटी सर्व्हिसला 19,87,457 रूपये वार्षिक ठेका दिला आहे. यामध्ये प्रशासकीय इमारतीला सहा आणि घनकचरा प्रकल्पाला तीन अशा प्रकारे नऊ सिक्यूरीटी गार्डसाठी 19,87,457 रूपये मोजले जात आहेत.
आजच्या घडीला लम्पी विषाणूने राज्यात थैमान घातलेला आहे. पूर्ण पशूधन संकटात आलेला आहे असे असताना नगरपालिकेच्या घनकचर्या प्रकल्पावर 113 ते 115 एवढी जनावरे बेवारसपणे मुक्तसंचार करत आहेत. या जनावरांच्या शेणामध्ये सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देखील आढळून येत आहेत असे असताना नगरपालिका पूर्णतः याबाबीकडे दुर्लक्ष करत आहे. या जनावरांपैकी काही जनावरांना लम्पीची लागण झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. लम्पी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पशूधन विकास अधिकारी पंचायत समिती व तहसिलदार यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्यधिकार्यांना लम्पी संसर्गाविषय घ्यावयची काळजी संदर्भात पत्रव्यवहार देखील केलेला आहे. तरी देखील नगरपालिका लम्पी विषाणूच्या संसर्गाला गांभीयाने घेत नाहीत. ही बाब मोठी गंभीर आहे.
घनकचरा प्रकल्पावर आमचा सिक्यूरिटी गार्ड आहे. परंतु, खरं पाहता सिक्यूरिटी गार्ड गेली आठ दिवस झाले घनकचरा प्रकल्पावर हजरच नाही. – अंकिता इसाळ, नगरपालिका आरोग्य विभाग
लम्पी विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहोत. नगरपालिकेला त्या संदर्भात तहसिलदारांनी संयुक्तपणे पत्र पाठवले आहे. आंबेगाव येथील घनकचरा प्रकल्पाला भेट देउन सध्यस्थिती काय आहे यांची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाय योजना करते. – डॉ.अर्चना जोशी, तालुका पशू अधिकारी