| पनवेल | वार्ताहर |
भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट 30 सप्टेंबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे नागरिकांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. पनवेल शहरातील बाजारपेठांमध्ये दोन हजारांची नोट वटविण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून पेट्रोल पंप, डीमार्ट, रिलायन्स फ्रेश, मॉल्स, ज्वेलर्स दुकाने, मोठी हॉटेल्स, शॉपिंग कॉप्लेक्स अशा उच्च ठिकाणी या नोटांचे व्यवहार वाढत आहेत.रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट लवकरच रद्द होणार असल्याचा निर्णय घेतल्यापासून अफवांना सर्वत्र पेव फुटला आहे. गैरसमज आणि अपुऱ्या माहितीमुळे लोकांमध्ये नोटेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. याची प्रचिती शहरातील बाजारपेठांमध्ये पहावयास मिळत आहे.
बँकेत कितीही जमा करू शकता पण नोटा बदलताना 20 हजारांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील, असे स्पष्ट केले आहे. तरीही अनेक लोक काहीही करू नोट खर्च करू, असा विचार करून व्यवहारात नोट वापरत आहेत.
पनवेल शहर परिसरातील मोठ मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोपम्प, डीमार्ट, रिलायन्स फ्रेश, मॉल्स, ज्वेलर्स दुकाने अशा ठिकाणांवर होणाऱ्या व्यवहारात दोन हजारांचे चलन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांची मात्र अडचण होत आहे. अनेक ठिकाणी नोटेवरून ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. काही ग्राहकांकडून दुकानदार नोट घेत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाईची मागणी ग्राहकांकडून होत आहे.