लाचखोर पोलिसाला पोलीस कोठडी

| अलिबाग । प्रतिनिधी ।

रोहा पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराला सहा हजार रुपयांची लाच घेताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

गोविंद मदगे असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. हा कर्मचारी रोहा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार यांचे वडील कांतीलाल वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रविणा यांच्यात वाद झाला होता. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील प्रविणा वाघमारे यांना अटक करावी लागेल, असे सांगून तक्रारदार यांना घाबरवले होते. या तक्रारीत मदत करण्यासाठी मदगे यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. 7) मार्च रोजी सापळा रचला. रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास सहा हजार रुपयांची लाच घेताना त्याला पकडले. त्याच्यावरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मदगे याची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

Exit mobile version