| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्ती आणि मल्लविद्येला संघटित स्वरूप देण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या मुंबई शहर जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मुंबई शहरातील कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध आखाडे, तालमी, पैलवान आणि कुस्तीप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले. ठाकूर हे कुस्ती क्षेत्राशी सातत्याने जोडलेले असून, पारंपरिक मल्लविद्येचा वारसा जपतानाच नवोदित पैलवानांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुंबईसारख्या महानगरात कुस्तीची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आखाडे व तालमींना प्रोत्साहन, युवा पैलवानांना मार्गदर्शन तसेच विविध कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
मुंबई शहरात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले अनेक कुस्तीपटू वास्तव्यास आहेत. त्यांच्यातील गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवोदित तसेच अनुभवी पैलवानांना प्रोत्साहन देऊन शहरातील कुस्ती चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांच्या निवडीबद्दल महासंघाचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील कुस्तीप्रेमी, वस्ताद, पंच आणि पैलवानांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील कुस्तीला नवी दिशा मिळून आगामी काळात अनेक गुणवंत पैलवान घडतील, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला.
प्रदीप ठाकूर यांची मल्लविद्या अध्यक्षपदी निवड
