| उरण | वार्ताहर |
मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पातील पथकर नाके उभारण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. असे आठ पथकर नाके या मार्गिकेवर बसवले जाणार असून, ते अत्याधुनिक स्वरुपाचे असतील.
शिवडी ते न्हावा शेवा अशी ओळख असलेला हा 21 कि.मी.चा मार्ग झपाट्याने पूर्णत्वास जात आहे. 21 पैकी 18 कि.मी.चा मार्ग समुद्रावर आहे. शिवडीत सुरु होऊन हा मार्ग चिर्ले येथे संपणार आहे. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर जेमतेम 40 मिनिटांवर येणार आहे. या मार्गाचे बांधकाम 31 मार्चपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते व ऑगस्टपर्यंत त्यावरील विविध सुविधा पूर्ण होणार होत्या. मात्र, बांधकाम कालावधी सुमारे दोन महिन्यांनी लांबला आहे. तसे असले तरी जूनपूर्वी सुविधा उभारणी सुरु व्हावी, यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) निविदा काढली आहे. पथकर नाक्यांबाबत ही निविदा आहे.
संबंधित कंत्राटदाराला एकूण आठ नाके उभे करायचे आहेत. यापैकी दोन नाके मुख्य असून, ते शिवडी व चिर्लेत मार्गिकेच्या मुखाशी असतील. उर्वरितपैकी तीन नाके प्रवेशाच्या ठिकाणी व तीन नाके बाहेर पडताना असतील. हे सहा नाके मार्गिका बदलाच्या ठिकाणी असतील. सर्व पथकर नाके अत्याधुनिक फास्टॅग व ईटीसी तंत्रज्ञानावर आधारित असतील. निविदेची अंतिम तारीख 22 मे आहे. हे पथकर नाके ‘ओपन रोड टोलिंग’ (ओआरटी) या प्रकारच्या यंत्रणेने सज्ज असतील. ही यंत्रणा वाहतूक कोंडीविरोधी असते. आठ नाक्यांवर या यंत्रणेने सज्ज असलेल्या 28 मार्गिका असतील. त्यात वाहनचालकांना गाडी न थांबवता थेट पुढे जाता येईल. गाडी नाक्यावर येण्याआधीच त्यांचा पथकर बँक खात्यातून थेट कापला जाईल, अशी ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे.