| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील रोज बाजार, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, लॉज तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध देह व्यवसाय व अश्लील हावभाव करणाऱ्या वारंगणांवर पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे.
तालुक्यातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे काही गावांमध्ये लोकवस्ती वाढत असताना वेश्यांची वस्तीदेखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. पनवेल शहरात खुलेआम वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला फिरत आहेत. शहराच्या रोज बाजार, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, विविध लॉज तसेच सार्वजनिक ठिकाणांसह अनेक गजबजलेल्या भागांत या वेश्या उघडपणे रस्त्यावर गिन्हाईक शोधत उभ्या असतात. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्याचप्रमाणे या भागातून जाताना सर्वसामान्य महिलांना मान खाली घालून जावे लागत आहे.
पटवर्धन रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत वेश्या व्यवसाय खुलेआम सुरू आहे. अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. याची दखल घेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने सलग दोन दिवस सार्वजनिक ठिकाणांसह अनेक गजबजलेल्या भागांत जाऊन या वारंगणांवर कारवाई केली आहे. या कारवाईचे पनवेलकरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.