जिल्ह्यात 104 टक्के लसीकरण
| रायगड | प्रतिनिधी |
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे राबविण्यात आली. या अंतर्गत रविवार (दि.28) रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 1 लाख 43 हजार 924 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. जिल्हाभरात 2 हजार 341 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी 29 जून ते 3 जुलैदरम्यान आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन 23 हजार 227 बालकांना पोलिओ लस दिली. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम कामगारांची वस्ती, वीटभट्ट्या, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांमध्ये विशेष पथकांद्वारे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात 104 टक्के लसीकरण झाले असल्याने पोलिओमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पल्स पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत आणि पोलिओमुक्त रायगड घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पालकांनीही लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 1 लाख 43 हजार 924 बालकांना 28 जून रोजी लस देण्यात आली. यासाठी जिल्हाभरात 2 हजार 341 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. त्यानंतर घरभेटीतून आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगावाडी सेविका यांनी 23 हजार 227 वंचित बालकांना पोलिओ लस दिली. यासाठी आरोग्य विभागातर्फे पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागासाठी 5 हजार 230 पथके तर शहरी भागासाठी 540 पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी 29 जून ते 3 जुलैदरम्यान स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम कामगारांची वस्ती, वीटभट्ट्या, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांमध्ये घरभेटी देउन वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लस दिली. त्युामळे जिल्ह्यात एकूण 104 टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी पोलिओमुक्त रायगडसाठी मेहनत घेतली.
नवी मुंबई विमानतळावर प्रथमच बूथ
पोलिओ लसीकरणाच्या दिवशी म्हणजेच 28 जून रोजी यावर्षी प्रथमच नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ येथे एक पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आला होता. यावेळी एकूण 25 बालकांना पोलिओ लस देण्यात आली.






