| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या हातभट्टी निर्मुलन करण्याची अंमलबजावणी कठोर केली जाणार आहे. तसेच बेकायदेशीर दारु, विक्री वाहतूक व निर्मितीवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले.
राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांची बदली सातारा जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रायगडचे नवे अधीक्षक म्हणून रविकिरण कोले काम पाहणार आहेत. दोन दिवसांपुर्वी त्यांनी रायगड जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
रविकिरण कोले यांनी गेली 11 वर्षे राज्य उत्पादन शुल्क विभागात सेवा केली आहे. गेली काही वर्षे ते परभणी जिल्ह्यात अधीक्षक म्हणून काम करीत होते. शासनाचा महसूल वाढ करण्याबरोबरच बेकायदशीर दारु विक्री, वाहतूक व निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
रायगड जिल्हयात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री, वाहतूकीवर कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर अनाधिकृत दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे रविकिरण कोले यांनी सांगितले.