रोह्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी; शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन
| चणेरा | प्रतिनिधी |
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केली असताना रायगड जिल्ह्यात केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, रोहा तालुक्यातही पावसाने दडी मारल्याने भातशेती धोक्यात आली असून, रोह्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख तथा सरपंच नितीन वारंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. रोहा तालुक्यात पावसाचे असमान वितरण, उशिरा सुरू झालेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट आणि भातशेतीच्या अंतिम टप्प्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
पावसाअभावी अनेक शेतजमिनींना भेगा पडल्या असून, उभे भातपीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून बाधित शेतीचे पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली. रोहा तालुक्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त आणि राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा. तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आवश्यक शासकीय आधार मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांना संघटित करून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नितीन वारंगे यांनी दिला. शिवसेना (उबाठा) शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
