। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारणात चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीत नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं. परंतु, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
देशाच्या भल्यासाठी काम करणारे नेतृत्व विरोधकांना हवे आहे. विरोधकांना एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही असेच प्रयत्न करत आहेत. मी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नाही कारण मी पुढील (लोकसभा) निवडणूक लढवणार नाही. सोमावरी (दि.22) पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राम ताकवले यांच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
“पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की, अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाही, मग पंतप्रधान पदाचा संबंधच येतो कुठे”
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहूल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले.