खालापूरमध्ये शेकापच्या लाल बावट्याचा झंझावात

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

खालापूरमध्ये रविवारी शेकापच्या लाल बावट्याचा झंझावात पहावयास मिळाला. निमित्त होते, शेकापच्या 79 व्या वर्धापन दिनाचे. सकाळपासूनच खोपोली, खालापूरचे रस्ते शेकापच्या कार्यकर्त्यांच्या आगमनांनी फुलून गेले होते. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, नेत्यांचे स्वागत करणारे बॅनर्स यामुळे सारे शहर शेकापमय होऊन गेले होते. त्यात आज पावसानेही उघडीप दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढला होता. याचे प्रत्यंतर शेकापच्या स्वागत मिरवणुकीत दिसून आले.

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे खालापूर नगरीत आमगन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात आणि वारकरी दिंडीच्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. सजवलेल्या जीपमधून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. खालापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून खालापूरच्या मुख्यभागातूान वाजतगाजत शेकापचा जयघोष करीत ही मिरवणूक निघाली.

विशेष म्हणजे या मिरवणूकीत महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. युवा कार्यकर्त्यांचा उत्साह नजरेत भरणारा होता. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, हर्षवर्धन सकपाळ रोहित पवार यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले आहे. त्या स्वागताने मान्यवर कमालीचे भारावून गेले. शेकापची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ पाहून त्यांनी आ. जयंत पाटील यांचे कौतूक केले. मिरवणूकीची सांगता कार्यक्रमस्थळी झाल्यावर पुष्पवृष्टीने स्वागत आणि औक्षण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, संतोष जंगम, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते. दरम्यान राज्य पुरोगामी विद्यार्थी संघटना प्रमुख ॲड. साम्या कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेकाप गीता नंतर महाराष्ट्र गीत सादर केले.

Exit mobile version