| महाड | चंद्रकांत कोकणे |
किल्ले रायगडावर येत्या 2 आणि 6 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी विद्यमान राज्यकर्त्यांनी यंत्रणेला वेठीस धरले आहे. त्यातच किल्ले रायगडावर भीषण पाणीटंचाई असल्याने कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना पाणीपुरवठा कसा करायचा याची चिंता प्रशासनाला लागलेली आहे. यावर उपाय म्हणून दीड लाख बाटलीबंद पाण्याची सोय करण्यात आली आहे. सरकारच्या या अट्टाहासाने यंत्रणेच्या डोळ्यात मात्र पाणी आल्याचे दिसत आहे.
2 जून आणि 6 जून रोजी 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. याकरिता शासनाने मोठा गाजावाजा केला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल होतील असा अंदाज आहे. यामुळे शिवप्रेमींची कोणत्याच प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन गेल्या महिनाभर मेहनत घेत आहे. मात्र वाढत्या उष्म्यामुळे गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यातच प्रशासनाने सूचना देऊन देखील गंगासागर मधून रोप वे आणि इतर ठिकाणी होणारा पाणीपुरवठा थांबला नाही. यामुळे गंगासागरमधील पाण्याने केंव्हाच तळ गाठला आहे. पाणीसाठ्याबाबत दरवर्षी त्याची खातरजमा करून त्याप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा लागेल याचे नियोजन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभाग करते मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद मोहरे यांच्याकडे महाड सह अलिबाग येथील अतिरिक्त पदाचा कार्यभार असल्यामुळे तसेच महाड तालुक्यात व पोलादपूर तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत असणाऱ्या कामांची संख्या मोठी आहे.त्यामुळे महाड ,पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी देखील या खात्याकडे सर्व अधिकार असल्याने रायगडावरील पाणीटंचाई बाबत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही.
गेली दोन वर्ष हा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा झाला यावर्षी भव्य स्वरूपात शिवराज्याभिषेक साजरा होणार आहे. प्रतिवर्षी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा गंगासागर आणि कोलिम तलावामधून केली जाते. यावर्षी तापमानात झालेली कमालीची वाढ यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वत्र डोके वर काढत आहे. गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील आटत चालले आहेत.
किल्ले रायगडावर गंगासागर, हत्ती तलाव, बारा टाके, कोलिम तलाव, हनुमान टाके इत्यादी पाणी स्त्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलिम तलाव मधील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी वापरले जाते. मात्र या तलावातील पाण्याची पातळी मे महिन्यात कमी होते. शिवाय शिवजयंती, शिवपुण्यतिथी, यानिमित्ताने गडावर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची गर्दी असते. अशा वेळी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. हत्ती तलावाची गळती काढल्याचा दावा मागील वर्षी प्राधिकरणाने केला असला तरी पावसाळा कमी होताच पुन्हा हा तलाव कोरडा पडत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची नळपाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्याने आणि रायगड प्राधिकरणच्या कामात नव्याने समाविष्ट झाल्याने नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे यामुळे अन्य ठिकाणचे पाणी गंगासागर मध्ये आणणे किंवा इतर ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे गडावर सुरु असलेल्या कामांवर गंगासागर मधून पाण्याचा होत असलेला अमर्याद उपसा झाल्यामुळे किल्ले रायगडावर मे महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईच्या झळा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांपासून स्थानिक प्रशासनाला बसू लागल्या. किल्ले रायगडावरील रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असलेली कामे व त्यासाठी येथील पाण्याचा होणारा वापर याबाबत होत असणारा समन्वयाचा अभाव यामुळे किल्ले रायगडावर पाणीटंचाई जाणवत आहे.
विकासकामांना पाणीपुरवठा
गडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु आहेत. या कामांना देखील याच तलावातून पाणी उपसा केला जात आहे. जून महिन्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला देखील याच तलावातील पाणी वापरले जात असल्याने सध्याच्या टंचाई काळात गडावरील कामांना गंगासागर मधील पाण्याचा वापर करू नये अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने करणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केल्यामुळे पाणीटंचाईची ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
चाळीस पाण्याच्या टाक्या
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गडावर पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी सुमारे 40 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या जाणार आहेत. जगदीश्वर मंदिर, टकमकटोक, महादरवाजा, होळीचा माळ, चित्त दरवाजा, वाळसुरे खिंड, याठिकाणी या टाक्या ठेवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 20 टँकरच्या माध्यमातून सातत्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाचाड मधील तलावामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून तलाव भरले जाणार आहे.
पाचाडमध्ये सध्या पाणीटंचाई असून गेली कांही दिवसांपासून येथील स्थानिक व्यवसायिकांना टँकर आणि इतर माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागत आहे. तलावातील पाणी साठा संपल्यामुळे आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.
सीमा बेंदुगडे, सरपंच पाचाड
गडावर सध्या असलेला पाणी साठा कमी झालेला आहे. काळा हौद आणि कोलीम तलाव यातून गंगासागर तलावात पाणी आणले जाणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाण्याच्या बाटल्यांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे
जे.यु.फुलपगारे, ग्रामीण पाणीपुरवठा