कारभार बीडीओंकडे
| ओरोस | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. 13 मार्चला पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. त्यामुळे राज्याने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्या-त्या गटविकास अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्यात पंचवार्षिक मुदती संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. या निवडणुका लांबण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात यावेळी पंचायत समितीच्या मतदारसंघांची (गण) पुनर्रचना होणार आहे. अनेक ठिकाणी इच्छुकांनी उमेदवारीसाठी चाचपणीही सुरू केली आहे. यातच आजपासून लोकनियुक्त लोकप्रतिनीधींचा कारभार संपून आठही ठिकाणी प्रशासकाची हाती सूत्र देण्यात आली आहेत. या ठिकाणी मुदती संपल्यानंतर तूर्त चार महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या आठही पंचायत समित्यांची मुदत 13 मार्चला संपली आहे. त्यामुळे येथे आजपासून प्रशासक कारभार सुरू झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील चार महिने गटविकास अधिकारी येथे कारभार पाहणार आहेत.
राज्यात लोकनियुक्त सदस्यांच्या पंचवार्षिक मुदती संपलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करावेत, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने राज्याकडे केली होती. पंचवार्षिक मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य निवडीसाठी निवडणूक घेणे अशक्य असल्याने निवडणूक आयोगाने ही विनंती केली होती. त्यानुसार राज्याने तूर्त चार महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढले. त्या-त्या पंचायत समितीत कार्यरत असलेल्या गटविकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासक कार्यरत झाले आहे. परिणामी नियुक्त प्रशासक आता गटविकास अधिकारी यांची जबाबदारी सांभाळतानाच सभापती म्हणून असलेली अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत.
समस्या आता अधिकार्यांच्या दालनात
पंचायत समितीचे सभापती हे तालुक्यातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन त्यांच्या दालनात जातात. सभापती समस्या सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करीत असतात; मात्र आता सभापती आणि प्रशासन प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी कारभार हाकणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना, सरपंच यांना आता गटविकास अधिकारी यांच्या दालनात समस्या घेऊन जावे लागणार आहे. त्या समस्या सोडवून घ्याव्या लागणार आहेत.
आणखी दोन सदस्य वाढणार
जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद सदस्य आहेत. यावेळी आणखी 5 सदस्य वाढविण्यात आले आहेत. तसेच 10 पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत. यात कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य तर प्रत्येकी दोन पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत.