अनेक मालवाहतूक बस स्थानकात उभ्या, खासगी ट्रकला मागणी
| अलिबाग | प्रमोद जाधव |
एसटीला आर्थिक अधार मिळावा म्हणून एक वर्षापुर्वी एसटी महामंडळामार्फत मालवाहतूक बस सेवा सुरु करण्यात आली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू गेल्या सहा महिन्यांपासून मालवाहतूक एसटी बसला प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक बस स्थानकात उभ्या आहेत. मालवाहतूक एसटी बसच्या जागी खासगी ट्रकला पसंती मिळाल्याने मालवाहतूक एसटी बस मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र समोर येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी सेवा बंद झाल्याने एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रवासी बसच्या जागी मालवाहतूक एसटी बस सेवा सुरु करण्यात आली. 1 मे 2022 रोजी हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यात सुरुवातीला दहा मालवाहतूक गाड्या सुरु करण्यात आल्या. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यावर या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. रास्तभाव दुकानांमधून धान्य घेऊन जाण्यापासून वेगवेगळ्या कंपन्यांचा माल एसटी गाड्यातून ने आण करण्याचे काम केले जात होते. यातून एसटी महामंडळाला आर्थिक अधार मिळू लागला आहे. महिन्याला तीन लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळू लागले होते. तोट्यात असलेली एसटी मालवाहतूक गाड्यांमुळे फायद्याच्या वाटेवर होती. मात्र रास्तभाव दुकानांपर्यंत मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूक गाड्यांच्या जागी खासगी ट्रकला मागणी वाढली. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नात हळूहळू घट होऊ लागली आहे. जानेवारी 2023 मध्ये 3 लाख 71 हजार 876 रुपयांचे एसटीला उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर उत्पन्नात हळुहळू एक ते दीड लाख रुपयांनी घट होऊ लागली आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होऊ लागला आहे.
जिल्ह्यात सध्या 37 मालवाहतूक गाड्या आहेत. त्यापैकी फक्त 50 टक्के गाड्या मालाची ने-आण करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे अनेक गाड्या एसटी बस आगारात धुळ खात उभ्या असलेल्या चित्र आहे. त्याचा परिणाम एसटी महामंडळा पुन्हा आर्थिक अडचणीत सापडण्याचे भिती व्यक्त केली जात आहे.
मालवाहतूक गाड्यांच्या उत्पन्नावर दृष्टीक्षेप
महिना – रक्कम (लाखात)
जानेवारी – 03,71,876
फेब्रुवारी – 02,39,583
मार्च – 02,06,325
मे – 01,67,925
मालवाहतूक ट्रकला सुरुवातीला चांगला प्रतिसाद होता. वेगवेगळया कंपन्याच्या मालाची वाहतूक करण्याबरोबरच धान्याची वाहतूक करण्याचे कामही मिळाले होते. परंतू ते काम आता मिळत नाही. त्याचबरोबरच प्रतिसादही कमी मिळत आहे. त्यामुळे एसटीला मिळणारा आर्थिक आधार कमी झाला आहे. प्रवासी सेवा वाढविण्याबरोबरच मालवाहतूक सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
दिपक घोडे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ रायगड विभाग