नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार

एकाच जागी चार स्वच्छता गृह

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान हे पर्यटन स्थळ असून, पर्यटकांच्या सुविधा देण्याचे दृष्टीने स्वच्छतागृह तसेच रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे इत्यादी सुविधा उभारण्याची जबाबदारी माथेरान नगरपरिषदेवर आहे. मात्र, शहरातील मुख्य रस्त्यांच्या आजुबाजूला स्वच्छता गृहांची आवश्यकता असताना एका प्रेक्षणीय स्थळी चक्क चार स्वच्छतागृह बसवून ठेवण्यात आली आहेत.

माथेरान नगरपरिषदेने मागील वर्षी 38 लाख रुपयांचे एक अशी आठ ते दहा ई-टॉयलेट खरेदी केली आहेत. त्यातील अनेक ई-टॉयलेट शहराच्या प्रवेशद्वारावर पडून आहेत. शहरातील रस्त्याच्या बाजूला पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अशी स्वच्छतागृह बसवण्याची आवश्यकता आहे. मात्र, येथील पांडे रोडवर असणाऱ्या मैदानात चक्क तीन शौचालय ठेवण्यात आली असून, शारलोट लेक जवळ मंदिराच्या आवारात तर प्रशासनाने हद्द पार केली आहे. त्याठिकाणी जुनी तीन आणि 38 लाख रुपयांचे नवीन शौचालय अशी एकूण चार शौचालय विनाकारण ठेवण्यात आली आहेत. याकडे नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधी सुद्धा केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी आणि काही महत्त्वाच्या पॉईंट्सवर ज्याठिकाणी खरोखरच शौचालयांची गरज आहे, तिथे शौचालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाईलाजाने पर्यटकांना जंगलाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासकीय राजवटीपासून ते आजतागायत सत्ता स्थापन होऊन देखील विकास कामांच्या नावाने बोंबा दिसत आहेत. सत्ता स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सत्ताधारी गटाचा प्रशासनावर किंचितही अंकुश नसल्याने गावाची विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढे यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि दुकानदार करीत आहेत.

Exit mobile version