महामार्गावर खाजगी वाहनांकडून लयलूट
सुधागड-पाली | वार्ताहर |
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे एैन दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल झालेले दिसले. अशावेळी प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे अनेक खाजगी वाहतूक दारांनी अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट केली.
दोन दिवसांपासून महामार्गावर तसेच इतर मार्गांवरील बस थांबे व नाक्यांवर वाहनांची वाट बघत प्रवासी तासनतास उभे होते. वृद्ध व महिलांचे खूप हाल झाले. पाली ते खोपोली फाटा या 30 किमी अंतरासाठी खाजगी वाहने 80 ते 100 रुपये घेत होते. तर खोपोली फाटा ते लोणावळा या अवघ्या 8 ते 9 किमी अंतरासाठी खाजगी वाहने तब्बल 80 रुपये घेत होते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी तर भरमसाठ पैसे आकारले जात होते.
गावागावात जाण्यासाठी अनेकांना मिनीडोअरचा आधार मिळाला. तर लांबच्या पल्ल्यासाठी खाजगी वाहने उपयोगी आली. या सर्व गाड्या प्रवाश्यांनी अगदी खचाखच भरुन जात होत्या. परिणामी खाजगी वाहतूकदारांचा धंदा तेजित होता. त्यांना जणू काही दिवाळीचा बोनस मिळाला. जिल्ह्यातील लांब पल्याच्या काही एसटी गाड्या सुरू होत्या. मात्र त्याही इच्छित स्थळी गेल्यानंतर तिथून पुढे जात नव्हत्या. जवळच्या थांब्यावरील प्रवाशांना देखील घेत नव्हत्या. त्यामुळे या प्रवाशांचे देखील प्रचंड हाल झाले.
बस स्थानकांवर गर्दी
ज्यांना या संपाबद्दल माहित नव्हते ते प्रवासी बस स्थानकात आले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु गाड्याच नाही हे समजल्यावर त्यांनी तेथून परतीचा मार्ग पकडला. जो तो मिळेल त्या वाहनांनी इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत होता.
पालीला तब्बल 2 तासांनी खोपोली फाट्यावर जाण्यासाठी खाजगी वाहन मिळाले. तिथून वाट पाहिल्यावर लोणावळ्यापर्यंत खाजगी वाहन मिळाले. त्यांनी खूप पैसे देखील घेतले. त्यानंतर लोणावळ्याला पीएमटीमध्ये बसून पुढील प्रवास केला. 4 तासांच्या प्रवासासाठी तब्बल 9 तास लागले.
संकेत खंडागळे, पाली
कामानिमित्त मुंबईत आलो होतो. एसटी संप असल्याने खूप गैरसोय झाली. त्यात एकच डोस घेतला असल्याने लोकल ट्रेनचा प्रवास करता आला नाही. शासनाने लवकर यावर सकारात्मक तोडगा काढावा.
अजित मणियार, शिक्षक,पाली