। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील 20 विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळाली. विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये 27 पैकी 14 बक्षिसे केळकर विद्यालायच्या विद्यार्थ्यांनी पटकावली. 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात चिंतामणराव केळकर विद्यालयातील मराठी माध्यमाचा 5 वीचा एक, तर आठवीचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. इंग्रजी माध्यमातील पाचवीचे सात, तर आठवीचे नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील एकूण 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्यातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 27 बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्यापैकी 14 बक्षिसे चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवली. चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण रायगडच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. जिल्हा विधी प्राधिकरण रायगडचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश संदीप स्वामी या कार्यक्रमाला उपस्थित होते.







