शिवकर ग्रा.पं.ला पाच लाख, तर साळविंडेला तीन लाखांचे बक्षीस
। अलिबाग । वार्ताहर ।
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत पनवेल तालुक्यातील शिवकर व म्हसळा तालुक्यातील साळविंडे ग्रामपंचायतीची रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची कोकण विभाग स्तरावरून तपासणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद गटातील प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ प्रभाग जाहीर करून दहा हजारांचे पारितोषिक देण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींमधून तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंतर्गत तपासणी करून जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी केली होती. तालुकास्तरावर जिल्हा परिषद प्रभागात असणार्या स्वच्छ ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत 50 हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरून जिल्हा परिषद गटातील प्रथम आलेल्या 59 ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीने तपासणी करून पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायत प्रथम क्रमांक मिळवत पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांक म्हसळा तालुक्यातील साळविंडे ग्रामपंचायत तीन लाख रुपये व तृतीय क्रमांक महाडमधील घावरेकोंड ग्रामपंचायत दोन लाख रुपये रोख बक्षीस पटकाविले आहे.
या विजेत्या ग्रामपंचायतीचे अभिनंदन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपाध्यक्ष सुधाकर घारे व सर्व विषय समितीचे सभापती यांनी केले असून, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात इतर ग्रामपंचायतीने यापुढे सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन केले आहे.