| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) विमानवाहू युद्धनौकेवर पहिल्यांदाच लढाऊ विमानाचे नाइट लँडिंग यशस्वी झाले. त्यामुळे ही युद्धनौका आता हवाई युद्धसज्ज झाली आहे. चार महिला अधिकाऱ्यांसह 1500 अधिकारी व नौसैनिकांना वाहून नेणारी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) ही मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. विक्रांत ही विमानवाहू नौका असल्याने हवाई चाचण्या अत्याधिक महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टीने लढाऊ विमान रात्रीच्या अंधारात खोल समुद्रात नौकेच्या धावपट्टीवर उतरविणे, हा आयएनएस विक्रांतसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

विमानवाहू युद्धनौकेला अन्य युद्धनौकेप्रमाणे तोफा, क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा नसते. त्यामुळेच या युद्धनौकांचा सुरक्षेचा मुख्य कणा हा हवाई मोहिमा व हवाई युद्धसज्जता, हाच असतो. यानुसार आयएनएस विक्रांतवर याआधी मिग-29 के व एलसीए तेजस या लढाऊ विमानांसह नौदलातील सर्व हेलिकॉप्टर यशस्वीरित्या युद्धनौकेवर उतरले असून त्यांनी यशस्वी उड्डाणदेखीली केले आहे. मात्र रात्रीचे उड्डाण व उतरण्याची चाचणी बाकी होती. त्यासाठी विक्रांतचा चमू जोमाने तयारी करीत होता. ही चाचणी यशस्वी झाल्याने आयएनस विक्रांत (INS Vikrant) हवाई मोहिमांच्या दृष्टीने युद्धसज्ज झाल्याची स्थिती आहे.
नौदल सूत्रांनुसार, मिग-29 के या जातीच्या दुहेरी उभे शेपूट असलेल्या लढाऊ विमानाने बुधवारी रात्री खोल अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतच्या धावपट्टीवर यशस्वीपणे उतरण्याचे कसब कुशल वैमानिकांद्वारे पूर्ण केले. याद्वारे युद्धनौकेने एकप्रकारे आत्मनिर्भर भारतचे सादरीकरण केले आहे.