शासकीय जागांवर अतिक्रमण;ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
लोकप्रतिनिधीसह शासकीय अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
सरपंच सुधीर चेरकर व ग्रामसेवक राहुल पोरे यांच्या वरदहस्ताने वरंडे पाडा येथील गुरचरण जागेत अतिक्रमण करुन बांधकाम केल्याचा आरोप सोमवार, दि. 22 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांनी केला आहे. तरी सरपंचासह ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वरंडेपाडा येथील उपोषणकर्त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
वरंडेपाडा येथील सरकारी गुरचरण जागा 10 एकर 23 गुंठे इतकी आहे. या जागेमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आले आहे. हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जागेच्या अतिक्रमणावरून गावातील दोन गटात वाद पेटलेला आहे. मात्र, हा वाद मिटविण्यात सरपंचासह ग्रामसेवक अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.
अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा सरपंच व ग्रामसेवक यांना पत्र देऊन तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारींना केराची टोपली दाखवत, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या दोघांच्या वरदहस्ताने अतिक्रमण व बांधकाम होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. सरपंचाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी शेवटी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सरपंचांच्या दबावामुळे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविले जात नसल्याचा आरोपही या ग्रामस्थांचा आहे.
ग्रामस्तरावर हा प्रश्न सोडविण्यास ग्रामसेवक व सरपंच अपयशी ठरल्याने न्यायासाठी वरंडे येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषणाचे हत्यार उगारल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उपोषणकर्त्यांना वरदहस्त कुणाचा?
सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वरंडे-पाडा येथील काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. हे सर्व लोक दळवी गटाचे कार्यकर्ते असल्याचे समजते. दरम्यान, गावागावातील तेढ सामोपचाराने मिटविण्यात यावा, यासाठी पुढाकार घेणे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असताना भांडणे लावण्याचे काम करीत असल्याची चर्चा आहे.
भाजप-शिंदे गटाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
राज्यात एकत्र संसार मांडला असला तरी अलिबाग तालुक्यात एकमेकांचे पाय खेचणाऱ्या भाजप-शिंदे गटातील वाद सर्वज्ञात आहे. अलिबाग-रोहा मार्गावरुन सुरु झालेला हा वाद संपुष्टात आला असल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा त्यावर ठिणगी पडली आहे. अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सुधीर चेरकरविरोधात दळवी गटातील कार्यकर्र्त्यांनी आवाज उठविला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही गटातील वरिष्ठ काय भूमिका घेणार याकडे सर्र्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वरंडेपाडा येथील गुरचरण जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. ग्रामसेवकांनी फक्त नोटीस देण्याचे काम केले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केली नाही. सरपंचाच्या दबावाखाली हा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. अतिक्रमण व बांधकाम तोडून टाकण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
अनिकेत घरत – ग्रामस्थ, वरंडेपाडा