सुवर्णवेधी नीरज जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा याने सोमवारी (दि.22) ही कामगिरी केली. दरम्यान, जागतिक अथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भूत प्रवास सुरू आहे. यावर्षी त्यानं डायमंड लीग जिंकून इतिहास रचला आणि आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.
‘भालाफेक’च्या जागतिक क्रमवारीतील टॉप-5ॲथलिट्स
नीरज चोप्रा (भारत) : 1455 पॉइंट्स
अँडरसन पीटर्स (ग्रॅनडा) : 1433 पॉइंट्स
जॅकब वडलेज्च (चेक रिपब्लिक) : 1416 पॉइंट्स
जुलियन वेबर (जर्मनी) : 1385 पॉइंट्स
अरशद नदीम (पाकिस्तान) : 1306 पॉइंट्स
नीरज चोप्रानं आपल्या 2023 च्या सीझनची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेत नीरजनं विक्रमी 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो येथे खेळायची आहे.