| पाली/बेणसे | वार्ताहर |
जिल्ह्यात पळस, पांगारा, काटेसावर, उक्शी, पांढरा कुडा आदि असंख्य वनस्पती मधयुक्त फुलांनी बहरलेल्या आहेत. शिवाय बांडगुळ, तोरण, बेहडा, जाम, तिरफळ, खुरी, भोकर, उंबर, कैलासपती व मोह आदि रानफळे आली आहेत. रखरखत्या उन्हात आपली क्षुधा शांत करण्यासाठी विविध प्रकारचे असंख्य पशुपक्षी या फुले व रान फळांकडे आकर्षित होत आहेत. शिवाय अनेक पक्षांचा हा विणीचा काळ देखील आहे. यामुळे रानावनात, परसात, लोकवस्तीत पक्षांचा किलबिलाट ऐकायला येत आहे. हे सर्व प्रसन्न व चैतन्यदायी वाटते. शिवाय हे पक्षी व प्राणी पाहण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी निसर्गप्रेमी, अभ्यासक, पर्यटक व छायाचित्रकार आवर्जून ठिकठिकाणी भेट देत आहेत.
माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले की साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून जंगलातील जवळजवळ 90 टक्के झाडांची पानगळती व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीच्या शेवटी ते मार्च च्या मध्यापर्यंत अगदी गुढीपाड्व्यापर्यंत अवतीभोवतीचे जंगल भकास होते. याच कालावधीत जंगल, माळरान व डोंगरांना वणवे लागल्यामुळे उरलं-सुरलं गवत, झुडुपे, वेली व मोठी सुकलेली झाडं जळून खाक होतात. याचा परिणाम त्या-त्या भागातील उष्णता आणि तापमान वाढून याची झळ मनुष्याप्रमाणे प्राणी, पक्षी, कीटक यांना देखील पोहोचते.
मात्र मार्च महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात रानावनात, डोंगरावर, रस्त्याच्या कडेला विविध औषधी वनस्पतींची फुलं फुलायला सुरुवात झाली आहे. अनेक प्रकारच्या फुलांनी व फळांनी येथील विविध झाडं बहरून गेली आहेत. याचाच फायदा घेत पक्षी या फुलातील मकरंद शोषून घेण्यासाठी व फळं खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या झाडांकडे आकर्षित होत आहेत. तर विविध प्राणी देखील फळं खाण्यासाठी झाडावर आणि झाडाखाली दिवसा व रात्री सहज दिसून येतात.
औषधी गुणधर्मयुक्त फुले
पळस ,काटे सावर म्हणजे शेवर, पांगारा, कौसी /कवची, धायटी, शेरल, उक्शी, पांढरा कुडा आदी औषधी वनस्पती बहरल्या आहेत. या फुलातील मध हा कित्येक पटीने औषधी आहे. त्याचबरोबर अनेक कीटक व पक्षांचे खाद्य देखील आहे. परिणामी अशा फुलांवर अनेक कीटक व पक्षी गर्दी करताना दिसत आहेत.
रानफळांची मेजवानी
बांडगुळ, तोरण, बेहडा, जाम, तिरफळ, खुरी, भोकर, कुंभा, जांभूळ, पिंपळ, पायरी, वड, काजरा, सालदोडा, धेड उंबर, शिवण, गुलाबी जाम, रांजण, उंबर, कैलासपती, मोह या झाडांची फळे खाण्यासाठी पक्षांबरोबर प्राणी देखील या झाडावर किंवा झाडाखाली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये ससे, भेकर, काळगे, सायाळ, उद मांजर, माकडे, मुंगूस, रानमांजर, चौशिंगा या सारखे प्राणी तर सहज दिसून येत आहेत.
आकर्षक पक्षांचा किलबिलाट
कोकिळा, तांबट, बुरख्या-हळद्या, सुरमई हळद्या, हरियाल, कोतवाल, महाभृंगराज, टकाचोर, साळुंखी, बुलबुल, पिवळ्या कंठाची चिमणी, जांभळा शिंजीर, सूर्यपंखी शिंजीर, कस्तुर, शिळकरी कस्तुर, चिपका, रानभाई, शिंपी, चष्मेवाला, राखी डोक्याची मैना, जंगली मैना, डोमकावळा, पोपट, गुलाबी डोक्याचा पोपट, मोठा कार्टुक हे पक्षी देखील विविध झाडांची फळे खाण्यासाठी विविध झाडांकडे आकर्षित होत आहेत. या झाडावरून त्या झाडावर त्या फांदीवरून या फांदीवर असे किलबिलाट करत उडत असतात.
आरोग्यकारी फुले व फळे
काही पक्षांचा विणीचा हंगाम एप्रिल पासून सुरु होतो. पक्षी व प्राण्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, पचनक्रिया सुरळीत व्हावी, विविध शारीरिक समस्यांचे निराकरण व्हावं, शरीरावर झालेल्या जखमा बऱ्या व्हाव्यात, पोटदुखीचा त्रास असेल तर दूर व्हावा या आणि अशा सारख्या विविध समस्यांवर नैसर्गिकरित्या उपाययोजना म्हणजे या कालावधीत जंगलातील विविध वनौषधींना आलेली फुलं आणि फळं खाणे हा आहे. असे राम मुंडे यांनी सांगितले.