सर्वसामान्या मार्गक्रमण करणे जिकिरीचे
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी जाता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले आहेत. मात्र शहरात हेच पदपथ फेरीवाल्यांसाठी व्यवसाय करण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास पालिकेकडून टाळाटाळ होत असल्याने, शहरातील जवळपास सर्वच पदपथांवर फेरीवाल्यांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य पादचाऱ्यांना पदपथावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे.
नवी मुंबई महापालिका रस्ते बांधणीसह नवीन पदपथ तयार करणे व जुन्या पदपथांची दुरुस्ती यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. पादचाऱ्यांना चालण्याच्या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली असली, तरी सद्यस्थितीमध्ये शहरातील 70 टक्के पदपथांचा वापर पादचाऱ्यांना चालण्यासाठी करता येत नाही. त्यातच पदपथांवरील गटारांवरील झाकणे गायब झाल्याने पादचाऱ्यांना त्यावरून चालणे धोक्याचे झाले आहे. अंधारात पदपथांवरील गटारात पडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
वाशी सेक्टर 9मध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून सायंकाळी येथून चालणे मुश्कील होते. एपीएमसीजवळील पदपथांचीही परिस्थिती अशीच आहे. माथाडी भवन परिसरामध्ये दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. मसाला बाजाराजवळील सेवा रस्त्यावर पदपथावर भाजी व फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. कोपरी गाव येथे पदपथावर वाहने उभी केली जात आहेत. ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात पदपथावर रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे रिक्षा स्टँड उभारले आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकासमोर सायंकाळी पूर्ण पदपथ भाजी व मासे विक्रेत्यांनी व्यापलेला असतो. नेरूळ सेक्टर 20 मध्ये गॅरेज, हॉटेल व्यावसायिक तसेच मटणविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तुर्भे नाका येथे मटण विक्रेत्यांनी पूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. कोपरी येथे कार व्यावसायिकांनी पदपथावर कब्जा केला आहे. रबाळे रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाजवळ पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील तुर्भे नाक्यावर पदपथावर फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. पदपथावर फेरीवाले बसत असल्यामुळे व रस्त्याकडेला वाहने लावण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही. त्यामुळे चालणे कठीण होत आहे. पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे साखळीचोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिक प्राजक्ता काळे यांनी सांगितले.