ग्रामसेव, ग्रामविकास अधिकाऱ्यांची 200 रिक्त पदे
| अलिबाग | प्रमोद जाधव |
गाव पातळीवरील सचिवालय संबोधल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे भरण्यास शासन उदासीन ठरला आहे. त्याचा परिणाम कार्यरत कर्मचाऱ्याच्या भरोवश्यावर ग्रामपंचायतींचा कारभार चालवावा लागत आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या 200 रिक्त पदांमुळे गावांच्या विकासावर परिणाम होण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विकासाला खिळ बसण्याचा धोका निर्माण होण्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.
रायगड ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती असून दोन हजार पेक्षा गावे, वाड्यांचा समावेश आहे. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 16 लाख 64 हजार इतकी आहे. मात्र जिल्ह्यातील गावांमध्ये वेगवेगळे लहान मोठे उद्योग धंदे सुरु झाल्याने गावांचा विस्तारदेखील झपाट्याने वाढू लागला आहे. गावांमध्ये नागरिकीकरण प्रचंड वाढू लागले आहे. त्यामुळे गावांतील लोकसंख्यादेखील 20 लाखापेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील गावे, वाड्यांचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या योजना पोहचविण्याचे काम ग्रामपंचायत करीत असते. त्या योजना ग्रामसभा, वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी करतात. गावे, वाड्यांमध्ये अंतर्गत रस्ते, घरकूल, नळ पाणी पुरवठा, जलव्यवस्थापन, कृषी व अन्य विभागातील वैयक्तीक व सार्वजनिक योजनांची अंमलबजावणी केली जाते.
जिल्ह्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची एकूण 659 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 200 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सोपविला जात आहे. एकाच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जात असल्याने या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना गावांच्या विकासासाठी पुर्ण वेळ देता येत नाही. पुर्ण वेळ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नसल्याने शासनाच्या योजनांची अंमलबजावणी मुदतीमध्ये पुर्ण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकिय कामकाजासह वेगवेगळ्या योजना राबविताना या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. रिक्त पदांमुळे गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे.
पदे | मंजूर | रिक्त | भरलेली |
ग्रामविकास अधिकारी | 110 | 86 | 24 |
ग्रामसेवक | 549 | 114 | 435 |
गावांची संख्या- 2000
ग्रामपंचायत संख्या- 810
लोकसंख्या- 16 लाख 64 हजार
जिल्ह्यात मंजूर पदांपैकी 200 पदे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची आहेत. अलिबाग, खालापूर, पनवेल, पेण या तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पदे भरली आहेत. परंतू महाड, श्रीवर्धन तालुक्यात पदे कमी असल्याने अतिरिक्त भार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर आहे. रिक्त पदे भरण्याची शासनाची प्रक्रीया सुरु असून पुढील महिन्याभरात भरती होण्याची शक्यता आहे.
राजेंद्र भालेराव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप, ग्रामपंचायत विभाग