वाहन चालकाचा प्रामाणिकपणा

महिलेला मिळाली दागिन्यांची पिशवी
रोहा | प्रतिनिधी |
नागोठणे ते निडी फाटा असा आपल्या दोन लहान मुलांसह प्रवास करत असलेली एक महिला आपली दागिने असलेली पिशवी इको गाडीत विसरून गाडीतून उतरली.पण सदर गाडीचे चालक विश्‍वनाथ पांडुरंग म्हात्रे रा आमटेम- पालखार यांनी स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेला रोहा पोलीस ठाण्यात बोलावून तिचे दागिने असलेली पिशवी परत केली.यामुळे प्रामाणिक वाहनचालक म्हात्रे याचे कौतुक होत आहे.
पेण तालुक्यातील आमटेम-पालखार येथे राहणारे विश्‍वनाथ म्हात्रे आपल्या आजारी बहिणीला माहेरी आणण्यासाठी रोहा तालुक्यातील डिंगणवाडी या गावी निघाले होते.वाटेत पूजा प्रनोत धुमाळ यांनी सदर गाडीला हात करून निडी येथे जाण्यासाठी लिफ्ट मागितली.दोन लहान मुलांसह असलेल्या या महिलेला घेऊन म्हात्रे यांनी तिला निडी फाटा येथे उतरवले.व गाडी घेऊन ते त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेले असता गाडीत मागच्या बाजूला त्यांना एक पिशवी आढळून आली.सदर पिशवी उघडून पहिली असता त्या पिशवीत सोन्याचे दागिने व अन्य काही वस्तू त्यांना दिसून आल्या. त्यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दिपक गिजे यांच्याशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला.तेव्हा गिजे यांनी पत्रकार जितेंद्र जोशी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकारची माहिती दिली.व संबंधित वाहनचालक सदर पिशवी घेऊन रोहा पोलीस ठाण्यात येत आहे.आपण महिलेचा शोध घ्या अशी विनंती केली. याबाबत पत्रकार जोशी यांनी रोहा पोलीस ठाण्यात माहिती दिली असता संबंधित महिला दागिने असलेली पिशवी गहाळ झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर थोड्याच वेळात वाहनचालक म्हात्रे यांनी रोहा पोलीस ठाण्यात येऊन संबंधित महिलेला तिचे दागिने असलेली पिशवी पोलिसांच्या समक्ष सुपूर्द केली.पिशवीत असलेल्या दागिन्यांचे मूल्य काही लाखात होते.यामुळे सदर महिला भांबावून गेली होती.पण वाहनचालकाच्या प्रामाणिकपणामुळे दागिने परत मिळाल्याने तिने सुटकेचा श्‍वास सोडत आभार व्यक्त केले.

Exit mobile version