पनवेल पालिकेत महाविकास आघाडीचा जोरदार विजय

तीन प्रभागांत भाजपचा सुपडा साफ

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन प्रभागांत भाजप युतीचा पूर्ण पराभव झाला असून, सर्व जागा जिंकण्याचा भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार महाविकास आघाडीचे तब्बल 18 उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक 1 मधून शेतकरी कामगार पक्षाचे जनार्दन पाटील विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून अर्चना भोईर, योगिता फडके, अरविंद पाटील आणि राम पाटील यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 3 मधून काँग्रेसच्या चिन्हावर हरेश केणी, प्रगती पाटील, तुषार पाटील आणि लीना कातकरी यांनी बाजी मारली आहे. तर, प्रभाग क्रमांक 14 मधून शेकापचे केतन भगत, मनीषा म्हात्रे, आर्या जाधव आणि लतीफ शेख विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीतून एकत्रित निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला झाला आहे. 2017 च्या पालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून खाते न उघडू शकलेल्या उबाठा गटाचे यंदा पाच उमेदवार विजयी झाले आहेत. शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्या एकत्रित ताकदीमुळे पनवेलच्या राजकारणात भाजपच्या एकहाती सत्तेला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः प्रभाग 2, 3 आणि 14 मधील निकाल महाविकास आघाडीसाठी उत्साहवर्धक ठरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शेकापमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. मात्र, हाच आत्मविश्वास भाजपाला नडल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

पैसा हरला, कार्यकर्ता जिंकला
प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपतर्फे 171 कोटी रुपयांची संपत्ती असलेले उमेदवार इकबाल काझी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या प्रभागात मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला, तरीही शेकापचे उमेदवार लतीफ शेख यांनी विजय मिळवला. प्रभाग 14 मधील चारही जागांवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याने ‌‘पैसा हरला, सामान्य कार्यकर्ता जिंकला' अशी प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे.
खारघरमध्ये भाजपच्या दोन जागा घटल्या
मागील निवडणुकीत खारघर वसाहतीतील संबंधित प्रभागांमध्ये भाजपाने सर्वच्या सर्व 12 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवत भाजपच्या दोन जागा कमी केल्या आहेत. खारघरमधील हा बदल भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
शेकापचे विजयी उमेदवार
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) खालील उमेदवार विजयी झाले आहेत- प्रभाग क्रमांक 1: जनार्दन पाटील, प्रभाग क्रमांक 2: अर्चना भोईर, योगिता फडके, अरविंद पाटील, राम पाटील. प्रभाग क्रमांक 14: केतन भगत, मनीषा म्हात्रे, आर्या जाधव, लतीफ शेख.
या विजयामुळे महाविकास आघाडीत शेकापची भूमिका अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Exit mobile version